Smart News24x7

Online Latest Breaking News

उद्योग सुरू ठेवण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स; संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभुमीवर उद्योगांचा आढावा

चंद्रपूर, दि. 18 : जिल्ह्यात मोठमोठे सिमेंट उद्योग, महाऔष्णिक विद्युत केंद्र यांच्यासह रोजगारनिर्मितीकरीता इतरही कारखाने मोठ्या प्रमाणात असल्याने ‘उद्योगांचा जिल्हा’ अशी चंद्रपूरची ओळख आहे. कोरोना विषाणु संसर्गाचा मोठा फटका औद्योगिक क्षेत्राला बसला. या काळात अनेकांचे रोजगार तर गेलेच पण अर्थव्यवस्थेची गतीसुध्दा मंदावली. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी राज्य शासनाने आता कोरोनाच्या काळातसुध्दा उद्योग जगत सुरू राहील, याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेतही जिल्ह्यातील उद्योग सुरू ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली ‘उद्योग टास्क फोर्स’ ची स्थापना करण्यात आली आहे.

कोव्हीड – 19 च्या संभाव्य तिस-या लाटेचा उद्योगांवर होणार विपरीत परिणाम टाळणे, यादरम्यान उद्योग सुरू राहावे, तसेच उद्योगांच्या ठिकाणी कोव्हीड विषयक नियमांचे काटेकोरपणे पालन होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, एमआयडीसी औद्योगिक असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक यांच्यासह उद्योग संघटनांचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व उद्योग सुरळीत सुरू राहण्यासाठी उद्योगांनी आपापल्या कार्यक्षेत्रातच कामगारांच्या राहण्याची व्यवस्था करावी. जे कर्मचारी बाहेर राहात असतील, त्यांच्यासाठी उद्योगाने ने – आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करावी. ज्या उद्योगांकडे वाहने नसतील, त्यांनी परिवहन मंडळाकडून बसेस घ्याव्यात. यासाठी जिल्हा प्रशासन मदत करेल. ज्या उद्योगांना उद्योगाकरीता ऑक्सिजनची गरज असते, त्यांनी ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण व्हावे. उद्योगाच्या कार्यक्षेत्रात पीएसए प्लांट, ऑक्सिजन टैंक किंवा ऑक्सिजन निर्मिती प्लांट करीता प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल. तसेच सर्व कामगारांचे लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे. लस खरेदीकरीता उद्योगांनी प्रशासनाला मदतीचा हात द्यावा. पेमेंट बेसिस वर खाजगी रुग्णालयांकरीता 25 टक्के लस राखीव ठेवली जाते. त्या कोटयातून पेमेंट करण्याची तयारी उद्योगांनी दर्शविली तर कामगारांकरीता लस उपलब्ध करून देता येईल. कर्माच्या-यांची शिफ्ट मधील गर्दी टाळावी.

आपापल्या उद्योगात तीन फूट अंतरावर काम करणारे (हाय रिस्क) व 10 फूटाच्या अंतरावर काम करणारे (लो रिस्क) क्षेत्र निर्धारीत करावे. हाय रिस्क भागात चेहऱ्यावर कवच, एप्रोन आदिंचा वापर करावा. कामगारांना एकाच वेळी जेवणाच्या कैंटीन मध्ये पाठवू नये. त्यांच्या वेगवेगळ्या वेळा निश्चित कराव्यात. किंवा जेवणाची व्यवस्था खुल्या जागेत करावी. जेणेकरून गर्दी होणार नाही. उद्योग सुरू राहण्यासाठी संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योगांनी कसे कार्यरत राहावे, याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

सर्व उद्योगांनी विलागिकरण कक्ष, तपासणी कक्ष, लासिकरण केंद्र स्वत: उभारावे, यासाठी प्रशासनाकडून सहकार्य केले जाईल. उद्योगांमध्ये कोव्हीड वर्तणुकविषयक बाबींचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे. यात नियमित मास्कचा वापर, सामाजिक अंतर, वारंवार हात स्वच्छ धुणे आदींचा समावेश आहे. यासाठी कंपन्यांनी नोडल अधिका-याची नियुक्ती करावी. कोरोनाच्या पहिल्या आणि दुस-या लाटेत उद्योग बंद करण्यात आले होते. आता मात्र संभाव्य तिस-या लाटेत उद्योग सुरू राहावे, यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

बैठकीला डब्ल्यूसीएलचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक, माणिकगड तसेच एसीसी सिमेंटचे प्रतिनिधी यांच्यासह इतरही उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 29 total views,  1 views today

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2021
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

error: Content is protected !!